वाटचाल शतकोत्तराकडे
"सहकाराचा मंत्र जपू , एकमेका सहाय्य करू" हा मंत्र घेऊन शेतकरी सोसायटी गेली ७५ वर्षे काम करत असून जागतिकीकरणामुळे जग जवळ आल्याने जगात शेतीमध्ये होणारे बदल नवनविन संशोधन यांची माहिती उपलब्ध होत असल्याने ७५ वर्षानंतर शेतकऱ्याकडे वाटचाल करत असताना भविष्याचा वेध घेण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.
"शेतकरी सुखी, तर जग सुखी" हे बोधवाक्य असलेल्या वसई शेतकरी विवध कार्यकारी सहकारी सोसायटीची स्थापना शेतकऱ्यांच्या अडी अडचणी सोडविण्यासाठी झाली. २० एप्रिल १९४० साली रामभाऊ हिराजी राऊत, गणेश जगन्नाथ वर्तक, तोमू अंतोन सील ह्यांच्या पुढाकाराने ३३ प्रवर्तकांनी मिळून सोसायटीची स्थापना केली. सोसायटीच्या स्थापनेनंतर अनेक अडचणी आल्या तरी सक्षम नेतृत्वामुळे संस्थेची वाटचाल सातत्याने सुरुच राहिली. सोसायटीच्या स्थापनेपासून चेअरमन असलेल्या रामचंद्र हिराजी राऊत ह्यांनी आपल्या परीने सोसायटीची प्रगती पहिली. प्रकृती अस्वस्थामुळे त्यांनी हे पद सोडले आणि त्यांच्या काळात मानद सचिव असलेल्या गणेश वर्तक ह्यांची निवड १९५६ साली चेअरमनपदी झाली. ह्यांच्या काळात १९५८ साली बरशेन गॅस वितरणाची सब एजन्सी संस्थेला मिळाली. १९६८ साली त्यांच्याच नेतृत्वाखाली संस्थेने स्वतःचे शेतकरी छाप मिश्रण खत बनविण्याचा उद्योग सुरु केला.
काळाची पाऊले ओळखून संस्थेच्या नेतृत्वाने आपल्या व्याप्तीमध्ये सातत्याने बदल केला. ह्या ठिकाणच्या बागायतीमधून भरघोस पिके काढण्यासाठी शेतकऱ्याला विविध प्रकारची औषधे, खते व अवजारे यांची आवश्यकता असते. हे ओळखून सोसायटीने आपल्या कार्यक्षेत्रात पाच गोदामे उघडून त्यातून विविध जातीच्या पेंडी, नाना पकारची खते, औषधे आणि अवजारांचा पुरवठा शेतकऱ्यांना केला. त्याच बरोबर वासळई, होळी, वरखड, देवाळे, किरवली व उमेळे येथे धन्य व किराणा माल विक्रीची केंद्रे सुरु केली. तसेच सिमेंट, लोखंडी पत्रे, पाईप इत्यादी इमारतीसाठी लागणाऱ्या साहित्याचा पुरवठा देवतलाव डेपोतून सुरु केला. १९६० साली सोसायटीने आपला पहिला ट्रक विकत घेतला. १ ऑगस्ट १९७६ साली बर्मासेल कंपनीच्या राष्ट्रीयकरणानंतर भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. ह्या कंपनीची सहकारी क्षेत्रातील पहिली वितरक सोसायटी म्हणून संस्थेने मान मिळविला. सोसायटी आज वसई तालुक्यातील ग्राहकांना घरपोच चांगली सेवा देत आहे.
नुसते नेतृत्व आणि संचालक मंडळ चांगले असून चालत नाही तर त्यांना प्रगतीसाठी कर्मचाऱ्यांचीही गरज असते. कार्यतत्पर १७५ कर्मचाऱ्यांमुळे सोसायटीला आता मागे वळून पाहावे लागत नाही. ह्या कर्मचाऱ्यांना आधुनिक शिक्षण देऊन त्यांची कार्यप्रणाली वाढविण्यावर सोसायटी सातत्याने भर देत आली आहे. महिला सबलीकरणावर भर देताना सध्याच्या संचालक मंडळाने महिला कर्मचाऱ्यांनाही आता सोसायटीच्या सेवेत सामावून घेतले आहे.
आजपर्यंत संस्थेला कै. गणेश जगन्नाथ वर्तक, कै. दामोदर जगू पाटील, कै. मोरेश्वर रघुनाथ चौधरी, श्री. भालचंद्र भास्कर पाटील ह्या सारख्या मंडळींचे खंबीर नेतृत्व लाभले. ह्या सगळ्या मंडळीनी आपापल्या कारकिर्दीत संस्थेस नवे नवे व्यवसाय मिळवून देऊन संस्थेच्या आर्थिक परिस्थिती बरोबरच संस्थेच्या स्थावर मालमत्तेतही भर घातली. संस्थेचे माजी चेअरमन अनिल पाटील ह्यांनी काळाची पाऊले ओळखून संस्थेची भारत गॅस शोरूम सुशोभित केली. त्यांच्याच काळात संस्थेचा हिरक महोत्सव संपन्न झाला. तर माजी चेअरमन श्री.सुरेश हरिश्चंद्र चौधरी ह्यांनी शेतकऱ्यांना अमोनियम सल्फेट खताचा होणारा तुटवडा लक्षात घेऊन गुजरात फर्टीलायझर्स लि. ची डिलरशिप मिळवून दिली. विद्यमान चेअरमन श्री. आशय राऊत ह्यांनी संस्थेचा व्यवसायवृद्धी होण्याच्या दृष्टीने सिंटेक्स कंपनी व भारत पेट्रोलियम कं. ची लुब्रीकंटची डीलरशिप, हैद्राबाद इंडस्ट्रीज लि. ह्या कंपनीची अॅरेकान पॅनेल्स व ब्लॉक्स, जे. के. व्हाईट सिमेंट डिलरशिप, इलेक्ट्रोलक्स वाटर प्युरीफायर व केंट आरो सिस्टम लि. यांची डिस्ट्रीब्युटरशिप घेतली आहे. तसेच नवीन युगाला अनुसरून संस्थेची सर्व विक्री केंद्रे संगणीकीकरण करून एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यानुसार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे काम पूर्ण झाले आहे. वाहने आणि कर्मचारी ह्यांची संख्या वाढवून सेल पॉईंटचे अत्याधुनिकीकरण करण्याचे काम सुरु केले आहे. त्याचबरोबर संस्थेने आपले स्वतःचे सॉफ्टवेअर बनविले आहे. त्याचा वापर सध्या सर्व दुकानातून करण्यात येत आहे.
आपल्या विभागातील वाढलेली स्पर्धा विचारात घेऊन स्पर्धात्मक युगात सामोरे जाण्यासाठी देवतलाव येथील सभागृहाचे वातानुकुलित यांत्रानेसाहित नुतनीकरण व भोजन कक्षाचे नुतनीकरणाचे कार्य पूर्ण केले.
चार मराठी माणसे एकत्र आली आणि त्यांनी निर्माण केलेली संस्था जास्त दिवस टिकत नाही असे सातत्याने म्हटले जाते. परंतु शेतकरी सोसायटीने हा समज खोटा ठरविला आहे. ह्या संस्थेने ७३ वर्षे प्रगतीची वाटचालच केली नाही तर वेगवेगळे विक्रमही प्रस्थापित केले आहेत. ह्या संस्थेचे भाग भांडवल आज ४,५०,३८५ रुपये इतके असून सुमारे १९ लाख ५५ हजार रुपयांच्या ठेवी सभासदांनी ठेवल्या आहेत. ह्यावरून सभासदांचा संस्थेवरील विश्वास दिसून येत आहे. आज संस्थेची उलाढाल ही ६८ कोटी रुपयांवर पोहोचली असून संस्थेची गुंतवणूक ३ कोटी २० लाखापर्यंत पोहोचली आहे.
विद्यमान चेअरमन श्री.आशय राऊत, व्हाईस चेअरमन श्री. अविनाश गणेश वर्तक व मानद सचिव श्री.हरेश्वर नारायण राऊत ह्यांच्या नेतृत्वाखाली जागतिकीकरणाची पाऊले ओळखून आपल्या ग्राहकांना सर्व वस्तू एकाच ठिकाणी मिळाव्यात ह्यासाठी शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे खते, औषधे, अवजारे व ग्राहकांसाठी सरकारी धान्य व केरोसीन यांची विक्री केली जाते. यांची विक्री संस्था न नफा न तोटा यास्वरुपात ग्राहकांना सेवा देण्यासाठी करते. याच बरोबर भारतगॅस,सिमेंटचे पत्रे, लोखंड,सिमेंट,सिंटेक्स टाक्या, मॅक लुब्रीकंट, अॅरेकान पॅनेल्स व ब्लॉक्स, जे. के. व्हाईट सिमेंट व नेरोलॅक पेंट्स तसेच किराणा (ग्रोसरी) यासारख्या वस्तू वाजवी दरात उपलब्ध करून देते.
संस्थेची घोडदौड सुरु असून पाच वर्षासाठी समोर ठेवलेली उद्दिष्टे ह्या संचालक मंडळाने दोन वर्षातच पूर्ण केली होती. प्रगतीच्या वाटा चालणाऱ्या ह्या संस्थेची वास्तू आज देवतलाव येथे दिमाखाने उभी असून वसई परिसरातील शेतकरी बांधवाना "शेतकरी राजा पुढे चल, तुझ्या मागे मी भक्कमपणे उभी आहे" असा संदेश देत आहे.
धर्मदाय फंडाचे वाटप
सोसायटीच्या धर्मदाय फंडामधून शैक्षणिक संस्था, वैद्यकिय आणि सामाजिक संस्थांना निधीचे वाटप दरवर्षी करण्यात येते. सभासदांच्या मुलांचा गुणगौरव करून एक वेगळी सामाजिक जबाबदारी संस्था सांभाळत आहे.
सभासदांच्या आरोग्याचीही काळजी
शेतकरी सोसायटी शेतकऱ्यांना शेतीमध्ये येणाऱ्या विविध अडचणी सोडविण्यासाठी ज्याप्रमाणे पुढाकार घेते, तसाच पुढाकार सोसायटीच्या सभासदांच्या आरोग्याचीही काळजी घेण्यासाठी घेते. नेत्रचिकित्सा शिबीर, आरोग्य शिबीर, आयुर्वेद चिकित्सा, चुंबकीय आरोग्य सेवा शिबीर अशी विविध शिबिरे सोसायटी घेत आली आहे.