वसई शेतकरी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि. ची वाटचाल ७५ व्या वर्षाच्या प्रगतीची
कृषी संपन्न देश हा सर्वात सुखी देश असे समजण्यात येते. पुरातन काळापासून आपल्या भारताची गणना हि कृषी संपन्न देशात करण्यात येत आहे. विविध नैसर्गिक संपत्तीने नटलेल्या ह्या देशात शेतकरी हा आजही राजा समजला जातो. परंतु आता शेती कमी होऊ लागल्याने आहे ती शेती टिकवून त्या शेतीतून जास्तीत जास्त उत्पन्न कसे घेता येईल ह्यावर भर देण्याची वेळ आली आहे.शेतकऱ्यांच्या अडी अडचणी सोडविण्याच्या प्रयत्नातूनच निर्माण झालेल्या वसई शेतकरी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीने गेली सत्तर वर्षे 'शेतकरी सुखी तर देश सुखी' हे बोधवाक्य प्रमाणे मानून आपली वाटचाल सुरु ठेवली आहे.
सोसायटीची वाटचाल सुरुवातीला अत्यंत खडतर अशी होती.२० एप्रिल १९४० साली रामभाऊ हिराजी राऊत, गणेश जगन्नाथ वर्तक, तोमू अंतोन सील ह्यांच्या पुढाकाराने ३३ प्रवर्तकांनी मिळून सोसायटीची स्थापना केली. वसईतील त्यावेळी पानवेलीची लागवड मोठ्या प्रमाणावर होत होती. पानवेलीच्या बागायतीसाठी लागणारी पेंड, काथ्या, बांबू, टोकरे इत्यादी माल एकाच ठिकाणी व योग्य दराने मिळावा, शेतकऱ्यांना खते आणि शेती बागायतीला लागणारे सामान योग्य दरात मिळावे ह्यासाठी प्रयत्न करणाऱ्या ह्या सोसायटीला स्थापनेच्या वर्षातच अनेक समस्यांना सामोरे जावे लागले.
त्याकाळी बागायती शेती हाच ह्या ठिकाणचा मुख्य व्यवसाय होता. सोसायटीने शेतकर्यांना कर्जाऊ रक्कमा देऊन शेतकर्यांना उभारी देण्यासाठी हात दिला. संकटे आणि स्थैर्य ह्या उन पावसाच्या काळाचा सात आठ वर्षाच्या अनुभवामुळे आणि व्यापारी क्षेत्रात पदार्पण केल्याने व नेतृत्वाच्या दुरदर्शीपणामुळे अखेर सोसायटीला आर्थिक स्थैर्य येऊ लागले.
एका बाजूला सोसायटी प्रगतीच्या वाटा सर करत असतानाच दुसऱ्या बाजूला संकटे मात्र सोसायटीची पाठ सोडत नव्हती. १९४७ साली झालेल्या फाळणीचे परिणाम सर्वांनाच भोगावे लागत होते. ह्या भागातून पानवेलीच्या पानांना पाकिस्तानातील सिंध व पंजाब प्रांतात मोठी मागणी होती. परंतु १९५२ सालापासून भारताबरोबरचा पानाचा व्यापार बंद केल्याने शेतकऱ्यांनी सोसायटीकडून घेतलेल्या कर्जाची थकबाकी वाढू लागली. त्यातच मंदीची लाट आल्याने कापड आणि ध्याने ह्यामध्ये सोसायटीला १९ हजार रुपयांचा तोटा सहन करावा लागला.
काम करणाऱ्याना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते असे म्हणतात. परंतु नेतृत्व सक्षम असेल तर कितीही संकटे आली तरी त्यावर मात करता येते. सोसायटीलाही आतापर्यंत दूरदृष्टी असलेले सक्षम नेतृत्व सातत्याने मिळत गेल्याने सोसायटीची प्रगती होत गेली. सोसायटीच्या स्थापनेपासून चेअरमन असलेल्या रामचंद्र हिराजी राऊत ह्यांनी आपल्या परीने सोसायटीची प्रगती पाहिली. प्रकृती अस्वस्थामुळे त्यांनी हे पद सोडले आणि त्यांच्या काळात मानद सचिव असलेल्या गणेश वर्तक ह्यांची निवड १९५६ साली चेअरमनपदी झाली. ह्यांच्या काळात १९५८ साली बरशेन गॅस वितरणाची सब एजन्सी संस्थेला मिळाली. १९६८ साली त्यांच्याच नेतृत्वाखाली संस्थेने स्वतःचे शेतकरी छाप मिश्रण खत बनविण्याचा उद्योग सुरु केला.
काळाची पाऊले ओळखून संस्थेच्या नेतृत्वाने आपल्या व्याप्तीमध्ये सातत्याने बदल केला. ह्या ठिकाणच्या बागायतीमधून भरघोस पिके काढण्यासाठी शेतकऱ्याला विविध प्रकारची औषधे, खते व अवजारे यांची आवश्यकता असते. हे ओळखून सोसायटीने आपल्या कार्यक्षेत्रात पाच गोदामे उघडून त्यातून विविध जातीच्या पेंडी, नाना पकारची खते, औषधे आणि अवजारांचा पुरवठा शेतकऱ्यांना केला. त्याच बरोबर होळी, वरखड, देवाळे, किरवली व उमेळे येथे धन्य व किराणा माल विक्रीची केंद्रे सुरु केली. तसेच सिमेंट, लोखंडी पत्रे , पाईप इत्यादी इमारतीसाठी लागणाऱ्या साहित्याचा पुरवठा देवतलाव डेपोतून सुरु केला. १९६० साली सोसायटीने आपला पहिला ट्रक विकत घेतला. १ ऑगस्ट १९७६ साली बर्मासेल कंपनीच्या राष्ट्रीयकरणानंतर भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. ह्या कंपनीची सहकारी क्षेत्रातील पहिली वितरक सोसायटी म्हणून संस्थेने मान मिळविला. सोसायटी आज वसई तालुक्यातील ग्राहकांना घरपोच चांगली सेवा देत आहे. नुसते नेतृत्व आणि संचालक मंडळ चांगले असून चालत नाही तर त्यांना प्रगतीसाठी कर्मचाऱ्यांचीही गरज असते. कार्यतत्पर १७५ कार्माचार्यामुळे सोसायटीला आता मागे वळून पाहावे लागत नाही. ह्या कर्मचाऱ्यांना आधुनिक शिक्षण देऊन त्यांची कार्यप्रणाली वाढविण्यावर सोसायटी सातत्याने भर देत आली आहे. महिला सबलीकरणावर भर देताना सध्याच्या संचालक मंडळाने महिला कर्मचाऱ्यांनाही आता सोसायटीच्या सेवेत सामावून घेतले आहे.
काम करणाऱ्याना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते असे म्हणतात. परंतु नेतृत्व सक्षम असेल तर कितीही संकटे आली तरी त्यावर मात करता येते. सोसायटीलाही आतापर्यंत दूरदृष्टी असलेले सक्षम नेतृत्व सातत्याने मिळत गेल्याने सोसायटीची प्रगती होत गेली. सोसायटीच्या स्थापनेपासून चेअरमन असलेल्या रामचंद्र हिराजी राऊत ह्यांनी आपल्या परीने सोसायटीची प्रगती पाहिली. प्रकृती अस्वस्थामुळे त्यांनी हे पद सोडले आणि त्यांच्या काळात मानद सचिव असलेल्या गणेश वर्तक ह्यांची निवड १९५६ साली चेअरमनपदी झाली. ह्यांच्या काळात १९५८ साली बरशेन गॅस वितरणाची सब एजन्सी संस्थेला मिळाली. १९६८ साली त्यांच्याच नेतृत्वाखाली संस्थेने स्वतःचे शेतकरी छाप मिश्रण खत बनविण्याचा उद्योग सुरु केला.
आजपर्यंत संस्थेला कै. गणेश जगन्नाथ वर्तक, कै. दामोदर जगू पाटील, कै. मोरेश्वर रघुनाथ चौधरी, श्री. भालचंद्र भास्कर पाटील ह्या सारख्या मंडळींचे खंबीर नेतृत्व लाभले. ह्या सगळ्या मंडळीनी आपापल्या कारकिर्दीत संस्थेस नवे नवे व्यवसाय मिळवून देऊन संस्थेच्या आर्थिक परिस्थिती बरोबरच संस्थेच्या स्थावर मालमत्तेतही भर घातली. संस्थेचे माजी चेअरमन अनिल पाटील ह्यांनी काळाची पाऊले ओळखून संस्थेची भारत गॅस शोरूम सुशोभित केली. त्यांच्याच काळात संस्थेचा हिरक महोत्सव संपन्न झाला. तर माजी चेअरमन श्री.सुरेश हरिश्चंद्र चौधरी ह्यांनी शेतकऱ्यांना खताचा होणारा तुटवडा लक्षात घेऊन गुजरात फर्टीलायझर्स लि. ची डिलरशिप मिळवून दिली. विद्यमान चेअरमन श्री. आशय राऊत ह्यांनी संस्थेचा व्यवसायवृद्धी होण्याच्या दृष्टीने सिंटेक्स कंपनी व भारत पेट्रोलियम कं. ची लुब्रीकंटची डीलरशिप, हैद्राबाद इंडस्ट्रीज लि. ह्या कंपनीची अॅरेकान पॅनेल्स va ब्लॉक्स, जे. के. व्हाईट सिमेंट डिलरशिप, इलेक्ट्रोलक्स वाटर प्युरीफायर व केंट आरो सिस्टम लि. यांची डिस्ट्रीब्युटरशिप घेतली आहे. तसेच नवीन युगाला अनुसरून संस्थेची सर्व विक्री केंद्रे संगणीकीकरण करून एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यानुसार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे काम पूर्ण झाले आहे. वाहने आणि कर्मचारी ह्यांची संख्या वाढवून सेल पॉईंटचे अत्याधुनिकीकरण करण्याचे काम सुरु केले आहे. त्याचबरोबर संस्थेने आपले स्वतःचे सॉफ्टवेअर बनविले आहे. त्याचा वापर सध्या सर्व दुकानातून करण्यात येत आहे.
चार मराठी माणसे एकत्र आली आणि त्यांनी निर्माण केलेली संस्था जास्त दिवस टिकत नाही असे सातत्याने म्हटले जाते. परंतु शेतकरी सोसायटीने हा समज खोटा ठरविला आहे. ह्या संस्थेने ७३ वर्षे प्रगतीची वाटचालच केली नाही तर वेगवेगळे विक्रमही प्रस्थापित केले आहेत. ह्या संस्थेचे भाग भांडवल आज ४,३४,३२५ रुपये इतके असून सुमारे २९ लाख ५२ हजार रुपयांच्या ठेवी सभासदांनी ठेवल्या आहेत. ह्यावरून सभासदांचा संस्थेवरील विश्वास दिसून येत आहे. आज संस्थेची उलाढाल ही ६० कोटी रुपयांवर पोहोचली असून संस्थेची गुंतवणूक २ कोटी पर्यंत पोहोचली आहे.
विद्यमान चेअरमन श्री.आशय राऊत, व्हाईस चेअरमन श्री. अविनाश गणेश वर्तक व मानद सचिव श्री.हरेश्वर नारायण राऊत ह्यांच्या नेतृत्वाखाली जागतिकीकरणाची पाऊले ओळखून आपल्या ग्राहकांना सर्व वस्तू एकाच ठिकाणी मिळाव्यात ह्यासाठी शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे खते, औषधे, अवजारे व ग्राहकांसाठी सरकारी धान्य व केरोसीन यांची विक्री केली जाते. यांची विक्री संस्था न नफा न तोटा यास्वरुपात ग्राहकांना सेवा देण्यासाठी करते. याच बरोबर भारतगॅस,सिमेंटचे पत्रे, लोखंड,सिमेंट,सिंटेक्स टाक्या, मॅक लुब्रीकंट, अॅरेकान पॅनेल्स व ब्लॉक्स, जे. के. व्हाईट सिमेंट व नेरोलॅक पेंट्स तसेच किराणा (ग्रोसरी) यासारख्या वस्तू वाजवी दरात उपलब्ध करून देते.
संस्थेची घोडदौड सुरु असून पाच वर्षासाठी समोर ठेवलेली उद्दिष्टे ह्या संचालक मंडळाने दोन वर्षातच पूर्ण केली होती. प्रगतीच्या वाटा चालणाऱ्या ह्या संस्थेची वास्तू आज देवतलाव येथे दिमाखाने उभी असून वसई परिसरातील शेतकरी बांधवाना "शेतकरी राजा पुढे चल, तुझ्या मागे मी भक्कमपणे उभी आहे" असा संदेश देत आहे.
सोसायटीच्या प्रगतीतील महत्वाचे टप्पे
रौप्य महोत्सव
२८ मार्च १९६५ रोजी सोसायटीचा रौप्य महोत्सव त्यावेळचे संस्थेचे अध्यक्ष ख्रिस्तवासी जॉन मर्यान कोयलो व चेअरमन श्री. गणेश जगन्नाथ वर्तक ह्यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाला. रौप्य महोत्सवाचे उद्घाटन तत्कालीन रेल्वेमंत्री नामदार स. का.पाटील ह्यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाऊसाहेब वर्तक हे होते. ह्यावेळी शेतकी व गुरांचे मोठे प्रदर्शन भरविण्यात आले होते.
सुवर्ण महोत्सव
२१ एप्रिल १९९० साली संस्थेचा सुवर्ण महोत्सव त्यावेळचे अध्यक्ष दामोदर जगू पाटील व चेअरमन मोरेश्वर रघुनाथ चौधरी ह्यांच्या नेतृत्वाखाली साजरा करण्यात आला. भाऊसाहेब वर्तक ह्यांच्या अध्यक्षतेखाली व राज्याचे तत्कालीन शिक्षण, पशुसंवर्धन व मत्स्यव्यवसाय मंत्री विलासराव देशमुख, तालुक्याचे आमदार हितेंद्र ठाकूर व मुळशी पुणे येथील आमदार अशोक मोहोळ यांच्या उपस्थितीत साजरा झाला.
हिरक महोत्सव
२३ एप्रिल २००० रोजी संस्थेचा हिरक महोत्सव त्यावेळचे अध्यक्ष भालचंद्र भास्कर पाटील व चेअरमन अनिल वामन पाटील ह्यांच्या नेतृत्वाखाली पेट्रोलियम मंत्री नामदार रामभाऊ नाईक, जिल्ह्याचे पालक मंत्री मधुकरराव पिचड, खासदार अशोक मोहोळ, श्रीमती तारामाई वर्तक व आमदार हितेंद्र ठाकूर ह्यांच्या उपस्थितीत साजरा झाला.
शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन मेळावे, सहली आणि विद्यार्थी गुणगौरव
सोसायटी शेतकऱ्यांसाठी वेळोवेळी कृषी मार्गदर्शनपर व्याख्याने, शेतकी सहली व मोफत निसर्गोपचार (प्राकृतिक चिकित्सा) शिबीर सातत्याने आयोजित करत आहे. त्याचबरोबर सभासदांच्या मुलांचे कौतुक करण्यासाठी विद्यार्थी गुण गौरव कार्यक्रम सातत्याने करत आहे. तसेच देशावर वेळोवेळी आलेल्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी सहाय्यक निधीतून संस्थेने मदत केली आहे. तसेच तालुक्यात कार्यरत असलेत्या सामाजिक, वैद्यकीय, शालेय संस्थानासुद्धा स्वतःच्या धर्मादाय फंड व जाहिरात मार्फत भरघोस मदत करत आहे.
शेतकरी शास्त्रज्ञ मंच
दै. अॅग्रोवनच्या सहकार्यातून सोसायटीने तालुक्यात शेतकरी शास्त्रज्ञ मंच स्थापन केला आहे. ह्या मंचाच्या सहाय्याने थेट शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून सोडविण्याचा प्रयत्न केला.
भारत गौरव पुरस्कार
वसई तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी गेली ७३ वर्षे काम करणाऱ्या वसई शेतकरी सहकारी सोसायटीच्या कार्याची दखल घेऊन संस्थेस ऑल इंडिया अचिवर्स फाऊंडेशनच्या वतीने संस्थेस "भारत गौरव पुरस्कार", २०१२ साठी माजी राज्यपाल भिष्मनारायण सिंग ह्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. दिल्ली येथील गुलमोहर हॉलमध्ये झालेल्या ह्या कार्यक्रमाला माजी राज्यपाल भिष्मनारायण सिंग, माजी निवडणूक आयुक्त जीव्हीजी कृष्णमुर्ती, माजी मुख्य न्यायाधीश प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सोसायटीच्या वतीने चेअरमन श्री. आशय हरेश्वर राऊत ह्यांनी हा पुरस्कार स्विकारला.
इंटरनॅशनल अचिव्हर पुरस्कार
"भारत गौरव पुरस्कार" २०१२ प्राप्त झाल्यानंतर काही कालावधीनंतर संस्थेस इंटरनॅशनल अचिव्हर्स कॉन्फरन्सचा "इंटरनॅशनल अचिव्हर पुरस्कार" प्राप्त झाला आहे. या पुरस्काराने सोसायटीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. बँकॉक येथे झालेल्या एका कार्यक्रमात पुरस्काराचे वितरण झाले.
शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी झटणारी संस्था व भारतगॅस ग्राहकांसाठी उत्तम सेवा देणारी संस्था म्हणून ओळखली जाते. हे कार्य पाहूनच सोसायटीला पुरस्कार देण्यात आला. पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी थायलंड मधील राजकीय नेते उपस्थित होते. दोनही पुरस्कार प्राप्त झाल्याने संस्थेचे नाव हे राष्ट्रीय पातळीवरून आंतरराष्ट्रीय पातळीवर जावून पोहोचले आहे.
सहकार भूषण पुरस्कार
महाराष्ट्र शासन सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग यांच्या वतीने संस्थेस सहकार भूषण पुरस्कार - २०१३ कोकण विभागासाठी गौरविण्यात आले. दिनांक १६ जानेवारी २०१४ रोजी मा. मुख्यमंत्री श्री. पृथ्वीराज चव्हाण, मा. उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार व मा. मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते नागपूर येथे झालेल्या पुरस्कार सोहळ्यात सन्मानपत्र देण्यात आले.